spot_img
spot_img

अपयशाला हरवलं, जिद्दीने इतिहास घडवला! बुलढाण्याचा सागर उज्जैनकर UPSCत झळकला; भारत सरकारच्या जिल्हा युवा अधिकारी वर्ग-१ पदावर निवड

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्याच्या मातीतून पुन्हा एकदा जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचा झेंडा देशपातळीवर फडकला आहे. शहरातील चिरंजीव सागर संगीता रुपराव उज्जैनकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयात जिल्हा युवा अधिकारी वर्ग-१ पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सागर उज्जैनकर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बुलढाणा येथील भारत विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यालयातून अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे गुरु गोविंद सिंह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड येथून बी.टेक. पदवी घेतली. अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्यांनी पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी अकॅडमीमध्ये UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे या तयारीदरम्यान त्यांनी एलएलबीची पदवीही यशस्वीरीत्या पूर्ण केली.

UPSCच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने अनेक जण खचले असते; पण सागर यांनी अपयशाला शेवट न मानता त्यालाच पुढच्या यशाची पायरी बनवली. सातत्यपूर्ण अभ्यास, संयम आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर त्यांनी 2024 च्या UPSC परीक्षेत यश मिळवत जिल्हा युवा अधिकारी वर्ग-१ पदावर निवड निश्चित केली.

आपल्या यशाचे श्रेय सागर यांनी आई-वडील, भाऊ-बहिण, शिक्षक, मार्गदर्शक आणि मित्रपरिवाराला दिले आहे. त्यांच्या यशाची बातमी समजताच बुलढाण्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शहरात आगमन होताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!