spot_img
spot_img

पाऊस आला अन् रस्त्याचा ‘राज’ उघडा पडला! सुनगावात मुरुमाच्या नावाखाली माती टाकल्याचा आरोप; ग्रामस्थांचा संताप अनावर, चौकशी नाही तर आंदोलनाचा इशारा – राज इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाचा पर्दाफाश?

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून गावोगावी दर्जेदार रस्त्यांचे स्वप्न दाखवत असताना, जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे मात्र रस्त्याच्या कामाचा अक्षरशः ‘चिखल’ झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. खांडवी ते करणवाडी रस्त्याचे काम काही भागात समाधानकारक झाले असले, तरी सुनगाव हद्दीत राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मुरुमाच्या नावाखाली मातीमिश्रित साहित्य टाकून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, राज इन्फ्रास्ट्रक्चरचे फिल्ड ऑफिसर सत्यवान काळे आणि रंजीत काळे हे कंपनीच्या फायद्यासाठी नियमांना बगल देत मनमानी कारभार करत आहेत. या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले बांधकाम विभागाचे अभियंता प्रवीण पुंडकर हे प्रत्यक्ष पाहणीसाठी फिरकत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे कंपनी कर्मचाऱ्यांचे फावले असून, रस्त्याच्या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पावसाळा सुरू होताच या निकृष्ट कामाचा खरा चेहरा उघड झाला आहे. रस्त्यावर मुरुमाऐवजी चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वार घसरत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने सुनगाववासीयांमध्ये तीव्र संताप आहे.

“अनेकदा विनंती करूनही कुणी लक्ष दिले नाही. मातीमिश्रित मुरुमामुळे रस्ता नसून चिखलाचा ढिगारा झाला आहे. तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील,” असा इशारा तंटामुक्ती अध्यक्ष शालीग्राम भगत यांनी दिला आहे.आता वरिष्ठ अधिकारी राज इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करतात का? निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई होते का? याकडे संपूर्ण सुनगावचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!