spot_img
spot_img

EXCLUSIVE : बुलढाण्यात गुन्हेगारांचा गेम ओव्हर? १९ कोटींच्या कारवायांनी ‘तांबे पॅटर्न’ची जिल्हाभर दहशत! गांजा, रेती, गुटखा ते सायबर फ्रॉड… SP तांबे यांच्या रडारवर आले अन् गुन्हेगारांची झोप उडाली; ‘तांबे पॅटर्न’ने अवैध धंद्यांना चाप!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात २०२६ हे वर्ष गुन्हेगारांसाठी धडकी भरवणारे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विश्वास वाढवणारे ठरले आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या दमदार नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने गुन्हे उकल, अमली पदार्थविरोधी मोहीम, अवैध रेती तस्करी, गुटखा, सायबर गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या आघाडीवर विक्रमी कामगिरी करत जिल्ह्यात ‘तांबे पॅटर्न’ची जोरदार छाप उमटवली आहे.

वर्षभरात विविध कारवायांमधून पोलिसांनी तब्बल १९ कोटी १९ लाख १५ हजार ६०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये ७९ टक्के गुन्हे उकलण्यात पोलिसांना यश आले असून ४ कोटी ७ लाख ६१ हजार ३२९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करणारी ठरली आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘मिशन परिवर्तन’ने अमली पदार्थांच्या जाळ्यावर जबरदस्त प्रहार केला. या मोहिमेत ५५ गुन्हे दाखल करून ५८ आरोपींना अटक करण्यात आली. ३२४.८४६ किलो गांजा व अफूसह जवळपास १ कोटी ९९ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, पोलिसांनी फक्त कारवाईच केली नाही, तर पथनाट्य, व्यसनमुक्ती अभियान आणि जनजागृतीच्या माध्यमातून तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला.

अवैध रेती तस्करीविरोधातही बुलढाणा पोलिसांनी कडक भूमिका घेत ५३ गुन्हे दाखल केले. १०१ आरोपींना ताब्यात घेत ५ कोटी ७८ लाख २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रतिबंधित गुटख्याविरोधात १२ प्रकरणांत १४ आरोपींना अटक करून १ कोटी ८ लाख ३९ हजार १५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मद्यविषयक कायद्यांतर्गत १,९८१ गुन्ह्यांत २,०२८ आरोपींवर कारवाई झाली, तर जुगारविरोधी ८४२ कारवायांत १,२१५ आरोपींना चाप बसवण्यात आला.

सायबर गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला. हरवलेले २१७ मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले, तर सायबर फसवणुकीतील १७ लाख २८ हजार १३८ रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात यश आले. अपहरणाच्या ११० प्रकरणांपैकी ९१ व्यक्तींची सुटका, तर हरविलेल्या ७१८ व्यक्तींपैकी ५१२ जणांचा शोध लावण्यात आला.

वाहतूक नियमभंगाविरोधात ५५ हजार ९२९ प्रकरणांमध्ये कारवाई करून ४ कोटी १४ लाख ४६ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवरही ११२ प्रकरणांत कारवाई झाली.

कम्युनिटी पोलिसिंग, महिला-बालक सुरक्षा, डायल ११२, सायबर सुरक्षा, शाळा-महाविद्यालयांतील जनजागृती, वृक्षारोपण आणि रॅलींच्या माध्यमातून बुलढाणा पोलिसांनी जनतेशी थेट नाळ जोडली. त्यामुळे २०२६ मध्ये बुलढाणा पोलीस दलाने केवळ गुन्हेगारांना धडा शिकवला नाही, तर जनतेचा विश्वासही दुप्पट केला. SP निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखालील ही कामगिरी जिल्हा पोलिसांच्या इतिहासातील एक दमदार अध्याय ठरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!