बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. मात्र विधानसभेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही तारीख पुढे ढकलत असल्याचे सांगताच राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
“मुळात सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचीच नाही. सरकार केवळ चालढकल करत आहे. जास्तीत जास्त नव्हे, तर कमीत कमी शेतकरी कर्जमाफी योजनेत कसे बसतील, हाच सरकारचा छुपा अजेंडा आहे,” असा गंभीर आरोप रविकांत तुपकर यांनी केला. केवळ १० ते १५ टक्के शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करून उर्वरित शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले.
तुपकर म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांमध्ये गट-तट निर्माण करून भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. आज एक तारीख, उद्या दुसरी तारीख देत शेतकऱ्यांना २०२९ पर्यंत झुलवत ठेवण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. कर्जमाफीच्या निर्णयात फिरवाफिरवी केली, तर राज्यभरात शेतकऱ्यांचे जनआंदोलन उभे राहील,” असा थेट इशारा तुपकर यांनी दिला.
सरसकट, विनाअट कर्जमुक्ती आणि पिकविमा यासह विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन केले होते. प्रकृती खालावल्यानंतर आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारसोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र ती मुदत संपल्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने तुपकर पुन्हा आक्रमक झाले आहेत. लवकरच मुंबईत आंदोलन होणार असून राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरतील, असे त्यांनी सरकारला ठणकावले आहे.










