spot_img
spot_img

रुग्णालयातूनच तुपकरांची रणगर्जना; “शब्द पाळा, नाहीतर सरकारला झोप लागू देणार नाही!”

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीच्या लढ्याने आता निर्णायक वळण घेतले आहे. पाच दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाची सूत्रे हातातून जाऊ दिली नाहीत. रुग्णालयाच्या बेडवरूनच त्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली आणि पुढील संघर्षाचा ‘प्लॅन बी’ तयार केला.

या बैठकीत सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा आणि सरकारच्या आश्वासनांवर सखोल चर्चा झाली. तुपकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झालेल्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला, म्हणूनच सरकारला झुकावे लागले. सरकारने कर्जमुक्ती आणि पीकविमा याबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले आहे. मात्र आता आश्वासनांची नव्हे, निर्णयाची वेळ आली आहे. शब्द पाळला नाही, तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सरकारची भंबेरी उडेल, असा इशारा त्यांनी दिला.

“आतापर्यंतचा लढा महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने झाला. पण सरकारने विश्वासघात केला, तर पुढील आंदोलन शहीद भगतसिंगांच्या लढाऊ विचारांनी प्रेरित असेल. मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेन. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर जबाबदारी सरकारची असेल,” असा थेट इशारा तुपकर यांनी दिला.

बैठकीनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या भूमिकेकडे लागले आहे. सरकार शब्द पाळणार की संघर्षाची नवी ठिणगी पडणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!