बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मार्च २०२६ मध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर अखेर शासनाने मलमपट्टी केली आहे. राज्य शासनाने अकोला, बुलढाणा आणि भंडारा या तीन जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल १३ कोटी २७ लाख ९८ हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली असून, यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक १० कोटी ९९ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील १२ हजार ५२ शेतकऱ्यांच्या ६ हजार ६१०.६३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्र्यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष निधी मंजूर करून आणण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
अवकाळी पावसाने कापूस, हरभरा, गहू, भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असताना ही मदत त्यांच्यासाठी दिलासा देणारी ठरणार आहे. मंजूर निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा होणार आहे.
विशेष म्हणजे, बँकांनी ही रक्कम कर्जवसुलीसाठी अडवू नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. लाभार्थ्यांची दुबार नोंद होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांना दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत.











