जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागात भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिव्यांग मुलीला कांतीज्योती बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संरक्षण अधिकारी तुषार रमेश राणे यांनी तब्बल २४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यापैकी १२ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने त्यांना रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराच्या दिव्यांग मुलीस योजनेअंतर्गत मिळालेल्या आर्थिक मदतीच्या बदल्यात तसेच पुढील लाभ सुरू ठेवण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचे समोर आले. एसीबीने जळगाव जामोद येथील तालुका शेतकरी खरेदी-विक्री सहकारी समिती कार्यालयासमोर सापळा रचला आणि राणे यांना ताब्यात घेतले.
गरीब, निराधार आणि दिव्यांग मुलांच्या योजनांवरही अधिकारी कमिशनखोरी करत असतील, तर हा प्रकार संतापजनक आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.











