शेगाव (हॅलो बुलढाणा/महेंद्र मिश्रा) सध्या देशभरात चर्चेत असलेला “उत्तर प्रदेश पॅटर्न” आता संत नगरी शेगावातही लागू करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, गुन्हेगारी प्रवृत्तीला थेट लगाम बसावा, अशी भावना शेगावकरांमध्ये व्यक्त होत आहे.
पेठ मोहल्ला परिसरात दोन दिवसांपूर्वी पशुकतलीच्या कारणावरून दोन गटांत वाद निर्माण झाला. या वादाचे पुढे दगडफेक आणि घरात घुसून मारहाणीमध्ये रूपांतर झाल्याने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, एकूण 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या तक्रारीत शेख मजिद शेख इसाक, वय 32, रा. पेठ मोहल्ला, शेगाव यांनी म्हटले आहे की, 10 जून रोजी 14 ते 15 जणांनी संगनमत करून त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. दगडाने डोक्यावर वार झाल्याने ते जखमी झाले असून, त्यांच्या भावालाही मारहाण झाल्याचा आरोप आहे. घरासमोर दगडफेक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
दुसऱ्या तक्रारीत सैयद जमीर सैयद सैलानी, वय 50, रा. पेठ मोहल्ला यांनी सांगितले की, आठ ते दहा जणांनी घरात घुसून शिवीगाळ केली आणि घरासमोर दगडफेक केली. विट लागल्याने त्यांच्या डोळ्याखाली दुखापत झाली, तर पुतण्यालाही मारहाण झाल्याचा आरोप आहे.
दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमे आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करून थांबू नये, तर अशा कायदा हातात घेणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.










