बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला आता मराठवाड्यातूनही जबरदस्त बळ मिळाले आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे आणि हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी आंदोलनस्थळी भेट देत तुपकरांच्या संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे यांनी रविकांत तुपकर यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज असल्याचे सांगत, “भाऊ एकटे नाहीत, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी-शेतमजूर जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. शेतकरी, माती आणि संस्कृतीसाठी लढणाऱ्या नेतृत्वाला आता राज्यभरातून साथ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ही कर्जमाफी नाही, तर कर्जवसुली योजना आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकारने पाळलाच पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळालाच पाहिजे. रविकांतभाऊ तुपकर यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
नामदेव पतंगे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मराठवाड्यासह राज्यभरातील कार्यकर्ते या लढ्यात सक्रिय सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. आता हा संघर्ष केवळ बुलढाण्यापुरता मर्यादित राहिलेला नसून राज्यव्यापी जनआंदोलनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
रविकांत तुपकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही. हा संघर्ष आता आणखी तीव्र होणार, असा निर्धार व्यक्त केला.










