बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील साखळी बुद्रुक गावातील पाणीटंचाईचा प्रश्न अखेर प्रशासनाला हादरवून गेला. स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठ्यासाठी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या विजयाताई कोळसे आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण चौथ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि मृत्यूंजय गायकवाड यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
२८ मे रोजी काढलेल्या मोर्चात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, तत्काळ टँकर सुरू करावा, एक वर्षाचा पाणीकर माफ करावा, प्रत्येक घरासमोर १००० लिटर पाण्याची व्यवस्था करावी, तसेच जलजीवन मिशनअंतर्गत खर्च झालेल्या सुमारे ५ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीची चौकशी करावी, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन उभे राहिले होते.
रविकांत तुपकर यांच्या मध्यस्थीनंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गिते आणि ग्रामसेविका जवंजाळ यांनी दोन दिवसांत धरण परिसरात दोन बोअरवेल, मोटारपंप आणि अतिरिक्त टँकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले












