बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सरसकट कर्जमाफी आणि हक्काच्या पिकविम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आता थेट मैदानात उतरणार आहेत. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेतील अटी-निकषांविरोधात तुपकरांनी एल्गार पुकारला असून 15 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून आपल्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
सरकारने निवडणुकीत सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात विविध अटी घालून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे. ही योजना कर्जमाफी नसून कर्जवसुलीची योजना असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून राज्यभर संतापाची लाट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकरी अजूनही हक्काच्या पिकविम्यापासून वंचित असल्याने सरसकट कर्जमाफी आणि उर्वरित पिकविमा तातडीने देण्याची मागणी तुपकरांनी केली आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन राज्यभर पेटू शकते, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.












