मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) तालुक्यातील पाथर्डी येथे अवैध हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा जानेफळ पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक छापा टाकत तब्बल 12 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करून साठवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ठाणेदार आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने बुधवारी कारवाई केली. या छाप्यात दत्ता उत्तम चव्हाण वय 52, रा. पाथर्डी, ता. मेहकर याच्या ताब्यातून 9 लिटर हातभट्टी दारू, प्लास्टिक कॅन, 230 लिटर गुळमिश्रित मोह सडवा आणि 16 टपरी पिपे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 181/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65 (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव यांनी दिली असून पुढील तपास तेच करीत आहेत.
ही कारवाई ठाणेदार आदिनाथ मोरे, पीएसआय संतोष जाधव, हेड कॉन्स्टेबल अतुल पवार आणि कॉन्स्टेबल विष्णू जगताप यांनी केली. अवैध दारूवाल्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचा पोलिसांनी इशारा दिला आहे.










