जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात वादळाने तांडव केला यामध्ये परिसरातील केळी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. अवघ्या एक तासाच्या थैमानात शेकडो एकरवरील केळीच्या पोखावलेल्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. 1 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले. वादळामुळे खेर्डा येथील शेतकरी नंदकिशोर इंगळे यांच्या गट नंबर 34 मधील एक महिनाआधी बसवलेले सौर ऊर्जा पॅनल, प्लेट वाऱ्यामुळे एंगलसह जमिनीवर उखडून पडले, तसेच केळीची तयार झाडे खोड मोडून घड जमिनीवर कोसळले. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
सहा महिने कष्ट करून जोपासलेली बाग एक तासात होत्याचे नव्हते झाले.बळीराजाच्या या संकटाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन विशेष पॅकेज जाहीर करावे, तात्काळ पंचनामा करून पीक विमा द्यावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी मदत न मिळाल्यास आणखी खचून जाईल,अशी भीती व्यक्त होत आहे.












Total Users : 3545571