बुलढाणा (हॅलो बुलडाणा) इंडियन मेडिकल असोसिएशन, बुलढाणा शाखेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि पदाचा गैरवापर करून आर्थिक अपहार केल्याच्या गंभीर आरोपांमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डॉ. अजित दलसिंग सिरसाठ आणि डॉ. गजेंद्र लक्ष्मण निकम यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॉ. जादुसिंग भाऊलाल राजपूत यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी इंडियन मेडिकल असोसिएशन, बुलढाणा शाखेचे अध्यक्ष व सचिव नसतानाही स्वतःला त्या पदांवर असल्याचे दाखवले. बनावट लेटरपॅड, बनावट शिक्के आणि खोटी कागदपत्रे वापरून संस्थेच्या नावाने पत्रव्यवहार करण्यात आला, नोटिसा काढण्यात आल्या आणि बँक खात्याशी संबंधित व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे, इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा बुलढाणाच्या खात्यातून तब्बल ३ लाख २३ हजार ७१६ रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त बुलढाणा यांच्या आदेशानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी नव्या कार्यकारिणीची कायदेशीर निवड झाली होती. या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून डॉ. के. बी. शर्मा, सचिव म्हणून डॉ. जी. वाय. व्यवहारे, तर सहसचिव म्हणून डॉ. जादुसिंग राजपूत यांची निवड झाली होती.
तरीदेखील आरोपींनी स्वतः अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवत संस्थेच्या नावाने पत्रव्यवहार सुरूच ठेवल्याचा आरोप आहे. इंडियन बँक शाखा बुलढाणा येथेही नव्या कार्यकारिणीला खाते हाताळण्याची परवानगी देऊ नये, असे पत्र आरोपींकडून संस्थेच्या लेटरपॅडवर देण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. त्यामुळे आरोपींना ते अधिकृत पदावर नसल्याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात फिर्यादीने यापूर्वी पोलीस प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दिल्या होत्या. मात्र कारवाई न झाल्याने अखेर न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १७५(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८, ३३५, ३३६, ३३८, ३४०, ६१ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे यांच्याकडे देण्यात आला असून, आता या प्रकरणात खरे दस्तऐवज कोणते, बनावट शिक्के कुठे तयार झाले आणि संस्थेच्या पैशांचा नेमका प्रवास कुठे झाला, याचा तपास पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेच्या नावाने असा दस्तऐवजी खेळ झाल्याचा आरोप असल्याने बुलढाण्यात चर्चेला उधाण आले आहे.










