spot_img
spot_img

राजुरा हत्याकांडाचा तपास वेगात! ‘हॅलो बुलढाणा’ने उचललेले प्रकरण महाराष्ट्रभर गाजले; SP निलेश तांबे दिवसभर जळगाव जामोदात तळ ठोकून, IGP महेश पाटीलांचीही एन्ट्री; DNA तपासणीसाठी मृतदेह उकरला!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) राजुरा परिसरातील गूढ हत्याकांड प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले असून, पोलीस यंत्रणा अक्षरशः ॲक्शन मोडवर आली आहे. सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने हे प्रकरण जनतेसमोर आणले होते. त्यानंतर या घटनेची चर्चा बुलढाणा जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पेटली आहे. या गंभीर प्रकरणात दोन दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडल्या.

आमदार रोहित पवार व राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये सुमारे दोन तास ठिय्या मांडल्यानंतर प्रशासनावर दबाव वाढला. त्यानंतर पोलीस यंत्रणेने तपासाला गती देत थेट घटनास्थळ आणि स्मशानभूमीकडे मोर्चा वळवला. आज फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी, बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलेश तांबे, सहतपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर संतोष खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, जळगाव जामोद तहसीलदार पवन पाटील, पोलीस निरीक्षक सचिन बागुल व इतर अधिकारी-कर्मचारी यांनी स्मशानभूमीत जाऊन दफन केलेला मृतदेह बाहेर काढून तपासणी केली.

या प्रकरणात मृतदेह DNA तपासणीसाठी पुन्हा बाहेर काढण्यात आल्याने तपास आता अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे बुलढाण्याचे एसपी निलेश तांबे हे दिवसभर जळगाव जामोद येथे स्वतः तळ ठोकून होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांनीही जळगाव जामोद पोलीस स्टेशनला भेट देऊन राजुरा परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली.

या संपूर्ण प्रकरणात आधीच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तत्कालीन तपास करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पंकज सपकाळे व तीन पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे तपासातील निष्काळजीपणा होता का? पुरावे दडपले गेले का? मृतदेहाची ओळख आणि तपासाची दिशा चुकीची होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

‘हॅलो बुलढाणा’ने सुरुवातीपासूनच या प्रकरणातील संशयास्पद बाजू ठळकपणे मांडल्या होत्या. आज त्याच बातमीचा परिणाम म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला आणि तपास यंत्रणा हलली. राजुरा हत्याकांड आता केवळ स्थानिक गुन्हा राहिलेला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले एक मोठे प्रकरण बनले आहे. तपासातून आता नेमके सत्य बाहेर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!