spot_img
spot_img

चिखलीत महिलांच्या पर्सवर पाळत ठेवून दागिने लंपास करणारी महिला जेरबंद! डी.बी. पथकाची संभाजीनगरमध्ये धडक कारवाई

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या एका महिलेला चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेत दमदार कारवाई केली आहे. सुवर्णा काकासाहेब काळे, वय ४० वर्ष, रा. पाथर्डी रोड, शेवगाव जि. अहमदनगर, ह.मु. चंदनापुरी ता. अंबड जि. जालना, असे आरोपी महिलेचे नाव आहे.

दिनांक ११ मे रोजी फिर्यादी महिला आपल्या वडिलांसह जुने सोन्या-चांदीचे दागिने मोडून नवीन दागिने करण्यासाठी चिखलीत आल्या होत्या. त्यांनी ५१.४१ ग्रॅम वजनाचे तीन चांदीचे जोडवे आणि अंदाजे ३ ग्रॅम सोन्याचे दोन डोरले व चार मणी असे एकूण ३१ हजार ९५० रुपयांचे दागिने घेतले होते. हे दागिने पिशवीत ठेवून त्या मनीषा स्टील होममध्ये गेल्या असता त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी महिलेने संधी साधून दागिने लंपास केले.

या प्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने जालना, छत्रपती संभाजीनगर परिसरात शोधमोहीम राबवली. घाटी हॉस्पिटल परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. अंगझडतीत चोरी गेलेले सोन्याचे डोरले, मणी आणि चांदीचे जोडवे हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. भुषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाने केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!