मेहकर/खंडाळा (हॅलो बुलडाणा) शहरासह खंडाळा, अंजनी, डोणगाव परिसराच्या आकाशात मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून एका विमानाने सलग २० पेक्षा अधिक घिरट्या घातल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विमान वारंवार त्याच परिसरावरून फेऱ्या मारत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून काही ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विमान बराच वेळ मेहकर शहर व खंडाळा परिसराच्या आकाशात घिरट्या घालत होते. विमानाचे हे अनोखे हालचाली पाहण्यासाठी अनेक नागरिक घरांच्या छतावर, मोकळ्या जागांमध्ये आणि रस्त्यावर जमा झाले. विमान इतक्या वेळ एकाच भागावरून का फिरत आहे, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
या घटनेचे दृश्य स्थानिक नागरिक गजानन राऊत यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. त्यांच्या मते, विमानाने केवळ एक-दोन नव्हे, तर सतत अनेक फेऱ्या घेतल्याने हा प्रकार सामान्य वाटत नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आणि कुतूहल दोन्ही निर्माण झाले आहे.
दरम्यान, विमानाच्या या सलग घिरट्यांमागे नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तांत्रिक तपासणी, हवाई सर्वेक्षण, प्रशिक्षण उड्डाण की इतर कोणते शासकीय काम, याबाबत नागरिकांकडून तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र प्रशासन अथवा संबंधित यंत्रणेकडून स्पष्टता न आल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.
वृत्त लिहिपर्यंत विमानाच्या फेऱ्या सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या प्रकाराची दखल घेऊन नागरिकांना अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. विमानाच्या सलग घिरट्यांमुळे मेहकर–खंडाळा परिसरात दिवसभर चर्चेचा विषय ठरला आहे.










