चिखली (हॅलो बुलडाणा/सैय्यद साहील) सामान्य नागरिकांकडून कर वसुलीसाठी कठोर भूमिका घेणाऱ्या चिखली नगर परिषदेच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नगर परिषदेच्या मालकीच्या आठवडी बाजार परिसरातील व्यापारी संकुलातील काही गाळ्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून नियमबाह्य कब्जा असल्याची चर्चा रंगली असून, या गाळ्यांचा वापर होत असतानाही पालिकेच्या तिजोरीत ना भाडे, ना कर जमा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
शहराच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करून नगर परिषदेने व्यापारी संकुले उभारली; मात्र त्यातून महसूल मिळण्याऐवजी काही गाळे अनधिकृत वापराच्या विळख्यात अडकले आहेत. सुरुवातीला मटन व चिकन विक्रेत्यांना देण्यात आलेले हे गाळे नंतर रिक्त झाले. पालिकेने ते ताब्यात घेऊन सील केल्याचे सांगितले जाते. मात्र काही भंगार व्यावसायिकांनी सील तोडून गाळ्यांवर कब्जा केल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे वापर सुरू असूनही पालिका प्रशासन गप्प का? सामान्यांकडून कर वसुली करताना कडक भूमिका घेणारी नगर परिषद या प्रकरणात नरम का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. भंगार दुकानांमुळे परिसरात घाण, कचरा व दुर्गंधी पसरत असल्याने तातडीने पाहणी करून अनधिकृत ताबा हटवावा, दुकाने सील करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.










Total Users : 3274649