धाड (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील म्हसला बु. येथे एक धक्कादायक आणि तितकीच भयावह घटना समोर आली आहे. जिथे मृतांना शेवटचा निरोप दिला जाणार आहे, ती स्मशानभूमी अद्याप पूर्णपणे तयारही झाली नाही; तोच अज्ञात चोरट्यांनी थेट स्मशानभूमीच्या बांधकाम साहित्यावरच डल्ला मारला आहे. स्मशानभूमीच्या कंपाउंड बांधकामासाठी आणलेली तब्बल ७ क्विंटल लोखंडी आसारी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असून, तिची किंमत अंदाजे ३५ हजार रुपये असल्याची माहिती आहे.
फिर्यादी सचीन रमेश तायडे वय ३० वर्षे, रा. म्हसला खुर्द, हे कोलवड येथील ठेकेदार आकाश चाकोते यांच्याकडे सुपरवायझर म्हणून काम पाहतात. चाकोते यांनी म्हसला बु. येथील स्मशानभूमीच्या कंपाउंड बांधकामाचा ठेका घेतला आहे. या बांधकामासाठी पुणे येथून लोखंडी आसारी मागवून स्मशानभूमीच्या कंपाउंडमधील मोकळ्या जागेत ठेवण्यात आली होती.
दि. ३० मे २०२६ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत सदर लोखंडी आसारी जागेवरच होती. मात्र दि. ३१ मे रोजी सकाळी १० वाजता सुपरवायझर सचीन तायडे कामावर गेले असता त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. स्मशानभूमीच्या परिसरात ठेवलेली लोखंडी आसारी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणात परिसरात खळबळ उडाली.
स्मशानभूमीसारख्या ठिकाणावरूनच चोरी झाल्याने गावात संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. “जिवंतांचे तर सोडा, आता चोरट्यांनी स्मशानभूमीलाही सोडले नाही,” अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. आता या ‘काळ्या भुतांचा’ माग काढण्यात पोलिसांना यश येते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.










