spot_img
spot_img

BREAKING! बापाचा ‘भयानक बदला’ की पोलिसांचा घाईघाईचा तपास? जळगाव जामोद कथित हत्याकांडात हादरवणारा खुलासा! लेक पळाली म्हणून बापाने स्वतःलाच ठरवलं खुनी; 20 दिवसांनी उघडलं पोलिसांच्या तपासाचं पितळ!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील कथित हत्याकांड प्रकरणाने आता संपूर्ण जिल्ह्याला हादरवणारे वळण घेतले आहे. ज्या मुलीचा खून झाल्याचा दावा करण्यात आला होता, तीच शिवानी तब्बल २० दिवसांनंतर जिवंत पोलिसांसमोर हजर झाल्याने पोलीस यंत्रणेचा तपासच प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यातच आता शिवानीचे वडील बापूराम कलमेकर यांचा खळबळजनक जबाब समोर आल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबावर समाजातील बदनामीचे सावट आले. मुलगी पळून गेल्याचा संताप आणि मनातील राग यामुळे वडील बापूराम कलमेकर यांनी चक्क न केलेल्या खुनाची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. जळगाव जामोद परिसरातील राजुरा धरणाजवळ २६ एप्रिल रोजी अर्धवट जळालेला आणि शिर नसलेला अनोळखी मृतदेह आढळला होता. हा मृतदेह शिवानीचाच असल्याचा समज करून वडील आणि भावाने पोलिसांसमोर “आम्हीच खून केला” अशी कबुली दिल्याची माहिती पुढे आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, डीएनए अहवाल, ठोस पुरावे किंवा मृतदेहाची खात्रीशीर ओळख पटण्याआधीच पोलिसांनी कबुली जबाबाच्या आधारे कारवाई केल्याचा गंभीर आरोप आता उपस्थित होत आहे. शिवानी जिवंत परत आल्यानंतर बाप-लेक निर्दोष ठरले, मात्र पोलिसांच्या तपासपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बुलढाणा कारागृहातून सुटल्यानंतर बापूराम कलमेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी त्यांच्यावर कोणताही दबाव आणला नव्हता. कोणत्याही प्रलोभनामुळे त्यांनी गुन्हा कबूल केला नाही. केवळ मुलगी घरातून गेल्याचा राग आणि बदनामीची भावना मनात असल्याने त्यांनी हे गंभीर पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर, जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना जिल्हा मुख्यालयात रिपोर्टिंग करण्याचे आदेश देण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, राजुरा धरण परिसरात सापडलेला तो शिर नसलेला जळालेला मृतदेह नेमका कोणाचा? चुकीच्या ओळखीच्या नादात खरा गुन्हेगार मोकाट तर फिरत नाही ना? शिवानी जिवंत आहे, कलमेकर कुटुंबाची सुटका झाली; मात्र त्या अज्ञात मुलीच्या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. आता पोलिसांना हा तपास पुन्हा शून्यापासून सुरू करावा लागणार असून, जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!