spot_img
spot_img

भिंत कोसळली अन् काळाने गाठले!; जावई-सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, पिंपळगाव राजा शोकसागरात…

खामगाव (हॅलो बुलढाणा) मृत्यू कधी, कुठे आणि कोणत्या रूपाने समोर येईल, हे कुणालाच सांगता येत नाही. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भिंतीवर पाणी टाकत असताना अचानक भिंत कोसळली आणि क्षणार्धात दोन कुटुंबांचा आधार हिरावला गेला. या भीषण दुर्घटनेत जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पिंपळगाव राजा गावावर शोककळा पसरली आहे.

मुकद्दर खान जमशद खान (वय ७४) आणि शेख युसुफ शेख बिस्मिल्ला (वय ३८) अशी मृतांची नावे आहेत. नात्याने हे दोघे सासरे आणि जावई होते. गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव राजा येथील एका बांधकामाधीन इमारतीच्या भिंतीला ते पाणी देत होते. याच वेळी अचानक भिंत खचली आणि थेट त्यांच्या अंगावर कोसळली.

भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना बाहेर काढले आणि तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.

या घटनेची माहिती सामान्य रुग्णालयातील कक्षसेवक विलास शिवराम वडोदे यांनी खामगाव शहर पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

अचानक घडलेल्या या दुर्दैवी दुर्घटनेमुळे पिंपळगाव राजा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका क्षणात दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!