लोणार (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील रेती घाटावरील वाद आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला असून ‘मेंबर’च्या मुलासह सात जणांविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लाळेणार येथील धनंजय मापारी या २६ वर्षीय तरुणाने बिबी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तो मागील काही महिन्यांपासून रेती घाटावर व्यवस्थापनाचे काम करत होता.
मंगळवारी रात्री उशिरा रॉयल्टीचे पैसे घेऊन घरी जात असताना सावरगाव तेली घाट रस्त्यावर काही जणांनी त्याची मोटारसायकल अडवली. “तुझ्या मालकाने आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला रिपोर्ट का दिला?” असा जाब विचारत शिवीगाळ सुरू झाली. त्यानंतर ‘मेंबर’चा मुलगा म्हणून ओळख असलेल्या अवीसह इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यावेळी एका आरोपीने हातातील दांडक्याने पायावर व पाठीवर मारहाण केली. दरम्यान, घटनास्थळी टिपर चालक येताना दिसताच सर्व आरोपी पळून गेले. मात्र गोंधळात धनंजय याचा ३५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.घटनास्थळी एक मोटारसायकल, घड्याळ आणि मोबाईल मिळून आल्याने प्रकरण आणखी रंगतदार बनले आहे. बिबी पोलीस पुढील तपास करीत आहेत.










