बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील हजारो शेतकरी अजूनही रखडलेल्या पिकविम्यापासून वंचित असून ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेल टंचाईमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या दोन्ही प्रश्नांवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंत्रालयात आक्रमक भूमिका घेत थेट कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे आणि पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांची भेट घेतली. मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तुपकर यांनी कृषिमंत्री ना. भरणे यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रखडलेले पिकविमा दावे तात्काळ मंजूर करून रक्कम अदा करण्याची मागणी केली. २०२४ आणि २०२५ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत न मिळाल्याने हजारो शेतकरी आर्थिक विवंचनेत असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाला मिळणारे कमी भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आ. मनोज कायंदे उपस्थित होते. तुपकर यांनी पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्याकडे जिल्ह्यातील डिझेल टंचाईबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली. ट्रॅक्टर, पंप आणि शेती मशागतीसाठी आवश्यक डिझेल मिळत नसल्याने नांगरणी, पेरणी आणि फवारणीची कामे खोळंबल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांची पेरणी थांबली तर सरकार जबाबदार राहील, असा इशारा देत तुपकर यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मुबलक डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. दरम्यान, कृषिमंत्री आणि पालकमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.










