देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) तब्बल २७ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने देऊळगाव मही ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला असून २५ मेपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आधी पगार द्या, मगच काम असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याने ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत आले आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्यीय ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या देऊळगाव मही ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांना तब्बल २७ महिन्यांचा पगार थकीत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून आर्थिक संकटामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने दोन महिन्यांचा पगार देत उर्वरित रक्कम लवकर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही प्रश्न कायम राहिल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटला.
दरम्यान, कोरोना काळातील कर्मचारी भत्ताही अद्याप मिळाला नसल्याने नाराजी अधिक तीव्र झाली आहे. आंदोलनामुळे शहरातील पाणीपुरवठ्यासह दैनंदिन कामांवर परिणाम होऊ लागला असून थकीत पगार मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.










