चिखली (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील केळवद येथील तब्बल ६ हेक्टर ९२ आर जमीन व्यवहारावरून मोठा वाद उफाळून आला असून, ५ कोटी २५ लाखांच्या कथित व्यवहारात शासनाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सुधाकर पुंडलिक खरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, धनंजय संपतराव सावंत व निर्मला सावंत यांनी १६ मे २०२४ रोजी नोटरीद्वारे ५.२५ कोटी रुपयांचा विक्री करार केला होता. त्यावेळी १ कोटी ७५ लाख रुपये अॅडव्हान्स दिल्याचाही दावा करण्यात आला आहे.
मात्र, पुढे २२ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या खरेदीखतात केवळ १ कोटी रुपयांचा व्यवहार दाखवण्यात आल्याचा धक्कादायक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे शासनाचे तब्बल २१ लाख २० हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवण्यात आल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे. या प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयाचीही दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप असून, संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, कारवाई न झाल्यास प्रकरण थेट आयकर विभाग, जिल्हाधिकारी, मंत्रालय आणि सोशल मीडियापर्यंत नेण्याचा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे. त्यामुळे चिखलीतील हा कोट्यवधींचा जमीन व्यवहार आता जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहे.
या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार? शासन महसुलाला फटका बसला का? आणि या व्यवहारामागे नेमकं कोणाचं ‘आशीर्वाद’ आहे? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.










