spot_img
spot_img

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’मध्ये बुलढाण्याचा ऐतिहासिक डंका; सुलज ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल

ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’त बुलढाणा जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील सुलज ग्रामपंचायतीने या अभियानात सर्वोच्च गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानात शाश्वत स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, शुद्ध पाणीपुरवठा, 100% कर वसुली आणि ई-गव्हर्नन्स अशा निकषांवर ग्रामपंचायतींचे गुणांकन करण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.

जळगाव जामोद तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. सुलज ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध कामकाज, स्वच्छता अभियान, डिजिटल शाळा सुशोभीकरण आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या आधुनिकीकरणातून विशेष छाप पाडली. गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे आणि विस्तार अधिकारी राजेंद्र कोलते यांच्या सातत्यपूर्ण भेटी व मार्गदर्शनामुळे गाव पातळीवर मोठा बदल घडून आला.

सरपंच लता टापरे, ग्रामविकास अधिकारी कविता जवंजाळकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शिक्षक, बचतगट, आशा वर्कर्स आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक प्रयत्नातून हे यश साध्य झाले. तपासणी समितीने दिलेल्या अहवालानुसार सुलज ग्रामपंचायतीला 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळण्यास पात्र ठरले आहे.

या यशामुळे सुलज ग्रामपंचायत राज्यस्तरासाठी पात्र ठरली असून जळगाव जामोद तालुक्याच्या विकासाची नवी ओळख निर्माण झाली आहे. ही सामूहिक मेहनत आणि एकजुटीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे यांनी दिली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!