रायपूर (हॅलो बुलढाणा/सचिन जयस्वाल) बालविवाह कराल तर थेट कारवाईला सामोरे जाल! असा कडक संदेश देत महिला व बाल विकास विभाग, चाइल्ड हेल्पलाईन आणि रायपूर पोलिसांनी घाटनांद्रा येथे होणारा बालविवाह ऐनवेळी उधळून लावला. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
दि. २१ मे रोजी डायल ११२ वर घाटनांद्रा येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची तक्रार प्राप्त होताच रायपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके यांनी तत्काळ अॅक्शन घेत चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी अनंत कळमकर व महिला पोलीस कर्मचारी वैशाली जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, चाइल्ड हेल्पलाईन बुलढाणाचे प्रकल्प समन्वयक शेख सोहेब यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांना सतर्क केले. संयुक्त पथकाने तातडीने कारवाई करत अल्पवयीन मुलीचा विवाह थांबविला.
यानंतर बालिकेला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुलीची रवानगी शासकीय बालिका गृह, बुलढाणा येथे केली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या समुपदेशकांनी मुलीचे समुपदेशन करून शिक्षण व बालविवाह कायद्याबाबत मार्गदर्शन केले










Total Users : 3275541