बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्या एका मुजोर अधिकाऱ्याला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी चांगलेच धारेवर धरल्याची घटना बुलढाण्यात घडली. एका पीडित महिलेनं आपल्या कामासाठी तुपकरांकडे धाव घेतली होती. तुपकरांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्याला फोन करून महिलेचे काम करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, महिला कार्यालयात गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देत, “तुम्ही सारखे यांच्याकडून/त्यांच्याकडून फोन लावता…” असे म्हणत तिचा अपमान केल्याचा आरोप आहे.
ही बाब तुपकरांच्या कानावर जाताच त्यांनी संतप्त होत अधिकाऱ्याला फोनवरच फैलावर घेतले. तुम्हाला एवढा माज आला आहे का? नागरिकांना त्रास देता? महिलांचा अपमान करता? ‘ऑफिसमध्ये येऊन कपडे काढून नंगा करून मारीन,’ अशा आक्रमक शब्दांत तुपकरांनी अधिकाऱ्याला सुनावल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
भर उन्हात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना टोलवाटोलवी, उद्धट वागणूक आणि प्रशासनातील वाढती मुजोरी यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशा अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तुपकरांसारख्या आक्रमक नेतृत्वाची गरज असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.










