बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सायबर पोस्टे बुलढाणा यांनी ऑनलाईन फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. देऊळगाव राजा येथील शेतकरी सचिन विनायक जपे यांना अज्ञात आरोपीने APK फाईलच्या माध्यमातून मोबाईलमध्ये अनधिकृत प्रवेश करून मोबाईल हॅक केला. त्यानंतर बँक खात्यातील OTP व SMS फॉरवर्ड करून विविध खात्यांमध्ये तब्बल 10 लाख 51 हजार 602 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी 07 एप्रिल 2026 रोजी सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण करून आरोपींनी ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम वळवली होती, ती सर्व खाती तात्काळ शोधून रक्कम होल्ड करण्यात आली.
एकूण 9 लाख 55 हजार रुपये होल्ड करण्यात आले असून त्यापैकी 8 लाख 57 हजार 470 रुपये न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराच्या खात्यात यशस्वीरित्या परत जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम परत मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सायबर पोलिसांनी नागरिकांना APK फाईल्स, अनोळखी लिंक व संशयास्पद मेसेजपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सायबर फसवणूक झाल्यास 1930 या हेल्पलाइनवर तात्काळ संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.










