जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीनकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (१७ मे) सायंकाळच्या सुमारास धडाकेबाज कारवाई करण्यात आली. सुनगाव आणि जामोद परिसरातील ढाब्यांवर पोलिसांनी अचानक ‘प्रोव्ही रेड’ (छापा) टाकून विनापरवाना अवैध दारूची विक्री करणाऱ्या दोन जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी एकूण २१,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक मोहीम राबवली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.जामोद ते सोनाळा रोडवरील ‘यश ढाबा’ येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला.त्याठिकाणाहुन ढाबा चालक मोहन शंकर धुर्डे वय ४० राहणार जामोद यांच्या ताब्यातून देशी दारू संत्रा ५००० च्या १०० बाटल्या (किंमत ८,००० रुपये), किंगफिशर कंपनीच्या १० बिअर (किंमत २,००० रुपये) आणि मॅकडॉवेल्स नं. ०१ व्हिस्कीच्या १० बाटल्या (किंमत २,०१० रुपये). असा एकूण १२,०१० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.तर दुसऱ्या कारवाईत सुनगाव रोडवरील ‘हॉटेल निसर्ग ढाबा’ येथे सायंकाळी ५:५० वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला.
तेथे बेकायदेशीरपणे दारूची विक्री सुरू असल्याचे आढळून आले.त्या ठिकाणी छापेमारी केली असता संदीप शत्रुघ्न कपले वय २९ राहणार सुनगांव याचे ताब्यातून देशी दारू संत्रा ५००० च्या १०० बाटल्या (किंमत ८,००० रुपये) आणि रॉयल चॅलेंज कंपनीच्या १५ बिअर (किंमत १,६५० रुपये). असा एकूण ९,६५० रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला.स्वतः ठाणेदार नितीनकुमार पाटील, पीएसआय अमोल पंडित,पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल गणेश तोंगळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील झुंझारकर सहभागी होते.दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या (म.दा.का.) कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











