बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात पुन्हा एकदा खाकीच्या आड आर्थिक घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘Fixalfha’ नावाच्या कथित गुंतवणूक योजनेच्या आमिषाने एका पत्रकाराची तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार थेट पोलीस अधीक्षकांकडे दाखल झाली आहे.
गवळीपुरा येथील पत्रकार इसरार अहमद देशमुख यांनी दिलेल्या प्रथम खबरीनुसार, सप्टेंबर 2024 मध्ये कारंजा चौकातील दवे टी सेंटर येथे त्यांची ओळख राजेश पदमने आणि श्रीकांत गाडे यांच्याशी झाली. दोघांनी स्वतःला पोलीस खात्यातील कर्मचारी असल्याचे सांगत ‘Fixalfha’ योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा 10,400 रुपये नफा मिळेल, असे आमिष दाखवले.
विश्वास बसावा म्हणून सुरुवातीला काही महिने 10 हजार रुपये खात्यावर पाठवण्यात आले. मात्र नंतर रक्कम कमी होत गेली आणि अखेर ऑक्टोबर 2025 पासून पैसे येणे पूर्णपणे बंद झाले. वारंवार संपर्क साधूनही “नफा एकत्र देऊ” अशी केवळ आश्वासने देण्यात आली, पण मूळ रक्कमही परत मिळाली नाही.
या प्रकरणात विशेष म्हणजे, आरोपी स्वतःला पोलीस कर्मचारी सांगत असल्याने संपूर्ण व्यवहारावर संशयाची छाया अधिक गडद झाली आहे. त्यामुळे हा केवळ फसवणुकीचा प्रकार आहे की ‘खाकी’च्या आड चालणारा मोठा रॅकेट, असा सवाल उपस्थित होत आहे.
आता या गंभीर आरोपांवर बुलढाणा पोलिसांची भूमिका काय राहणार? आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल होणार का, की पुन्हा एकदा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










