spot_img
spot_img

चिखलीत ‘वाहनविना सप्ताह’वरून राजकीय रणकंदन; भाजप-शिवसेना समर्थन, काँग्रेसचा तीव्र पलटवार!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) शहरात आज राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर इंधन बचतीसंदर्भात केलेल्या आवाहनानंतर वाहनविना दिवस/सप्ताह या उपक्रमावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर चिखली नगरपरिषदेतील सत्ताधारी गटाकडून अनोखा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी घोषणा करत मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून चिखली नगरपरिषदेत तीन दिवस वाहनविना प्रवास केला जाणार आहे. तसेच नगरपरिषदेतील सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हा उपक्रम पाळावा, असे आवाहन केले. या निर्णयाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचेही सांगण्यात आले.

मात्र या निर्णयावर तीव्र पलटवार करत काँग्रेस नेते गोपाल देवडे यांनी सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी आरोप केला की देश आर्थिक संकटात असताना पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत आहे. लोकांना पंपावर इंधन मिळत नाही, पण केवळ एका दिवसाचा दिखावा करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. तसेच त्यांनी खासदार, आमदार, मंत्री यांच्या पगार-भत्त्यांवरही प्रश्न उपस्थित करत खरी काटकसर करायची असेल तर ती दिल्लीपासून सुरू झाली पाहिजे, असा हल्लाबोल केला.

या घडामोडींमुळे चिखली शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. जनतेमध्ये मात्र या उपक्रमाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहीजण याला प्रेरणादायी पाऊल म्हणत आहेत, तर काहीजण याला केवळ राजकीय स्टंटबाजी असल्याचे सांगत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!