बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील विष्णुवाडी परिसरात, कलेक्टरांच्या बंगल्याजवळ असलेल्या भागात धक्कादायक घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या परिसरात 24 तास पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही चोरी कशी झाली? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सागर रामचंद्र वानखरे हे शुक्रवारी बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरात ठेवलेला सोनी कॅमेरा, सोनीचा हँडीकॅम, iPhone 5S, iPhone 8, सॅमसंग टॅब, स्मार्ट वॉच, लॅपटॉप तसेच अंदाजे 1 लाख रुपये रोख रक्कम अस एकूण 2 ते 2.50 लाख रुपयांची मुद्देमाल चोरीला गेल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच फिंगर फॉरेन्सिक लॅबची टीमही तपासासाठी बोलावण्यात आली असून घराच्या परिसराची सखोल तपासणी सुरू आहे.
या घटनेमुळे सुरक्षितता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिस तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.











