ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पर्यावरणपूरक जीवनशैली, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त भारताच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी १४ मे रोजी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला.
बळीराजा पांदण शेतरस्ते योजनेसंदर्भातील शासकीय बैठकीसाठी १४ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी जळगाव जामोद येथील आपल्या निवासस्थानापासून सातपुडा शासकीय विश्रामगृहापर्यंतचा प्रवास सायकलवरून केला. अतिशय साधेपणा, राष्ट्रहित आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा सायकल प्रवास व त्यांनी परिधान केलेला दाक्षिणात्य पोशाख – पांढरी लुंगी, कुर्ता आणि गळ्यातील गमछा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आ. डॉ. संजय कुटे यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि स्वच्छ भारताचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे. वाढते प्रदूषण, इंधन दरवाढ आणि पर्यावरणीय संकटाच्या पृष्ठभूमीवर त्यांनी केलेली ही कृती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य द्या : आ.डॉ.संजय कुटे
कमी गाड्या म्हणजे कमी प्रदूषण, इंधनाची बचत आणि परकीय चलनाची बचत, पर्यावरण संरक्षणासोबत राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देणे हीच नव्या भारताची खरी ओळख आहे. तसेच, छोट्या- छोट्या कृतीतूनही देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देता येऊ शकते असे सांगत त्यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक, सायकल आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले. स्वच्छ, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.











