जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा / ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील भेंडवळ बु. येथे कौटुंबिक वादाने भीषण वळण घेत पत्नीच्या हत्येपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांत गावात घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
15 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 4:15 वाजताच्या सुमारास आरोपी शहादेव शंकर भारसाकळे याने रागाच्या भरात आपल्या पत्नी मायावती शहादेव भारसाकळे (वय 46) हिच्यावर कुऱ्हाडीने जबरदस्त वार केले. या हल्ल्यात मायावती गंभीर जखमी झाल्या. घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून मुलगा मंगेश भारसाकळे (वय 23) याने तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मायावती यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वाद एवढ्या टोकाला जाऊ शकतो का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. मुलगा मंगेश भारसाकळे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अप क्र. 315/2026, कलम 103(1) BNS अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन व पोलीस निरीक्षक नितीनकुमार पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. सध्या आरोपी शहादेव भारसाकळे पोलीस ताब्यात असून, हत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.
कौटुंबिक कलहातून उफाळलेल्या या हिंसाचाराने पुन्हा एकदा समाजासमोर गंभीर प्रश्न उभा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे करीत आहेत.











