खामगाव (हॅलो बुलढाणा) शहरातील रेल्वे गेट परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून पतीनेच पत्नीवर लोखंडी सब्बलने (रॉड) डोक्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश रूपलाल सोळंके (वय २५) आणि त्याची पत्नी सविता प्रकाश सोळंके (वय २२) हे दोघे खामगाव शहरातील रेल्वे गेट परिसरातील झोपडपट्टीत वास्तव्यास होते. गुरुवारी रात्री सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास दोघांमध्ये घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद क्षणातच विकोपाला गेला आणि रागाच्या भरात आरोपीने घरातील लोखंडी सब्बल उचलून पत्नीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले.
या भयंकर हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिचा चेहरा आणि डोक्याचा भाग गंभीररीत्या विद्रूप झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. फिर्यादी संजय शेनाजी मेढे घटनास्थळी पोहोचले असता आरोपी रक्ताने माखलेला सब्बल हातात घेऊन तिथेच उभा असल्याचे दिसून आले.
आरोपीने “मी तिला मारले आहे, मी स्वतः पोलीस स्टेशनला हजर होतो,” अशी कबुली दिल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर तो घटनास्थळावरून निघून गेला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या क्रूर घटनेमुळे खामगाव शहरात संतापाची लाट उसळली असून अवघ्या २२ वर्षीय विवाहितेचा असा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.











