बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण ठरलेला मुलीचा विवाहसोहळा एका क्षणात दुःखाच्या महासागरात बुडाला. सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी येथे कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (ता.१३) सायंकाळी घडली. कुरूमदास कुंडलिक भुतेकर (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सनई-चौघड्यांचा नाद, मंगलाष्टकांचे स्वर आणि डीजेच्या गजरात आनंदाने न्हालेल्या वातावरणात नंदिनी हिचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा येथील प्रदीप नानोटे यांच्याशी पार पडत होता. सर्व विधी सुरळीत सुरू असताना कन्यादानाच्या वेळी अचानक कुरूमदास भुतेकर यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते मंडपातच कोसळले. उपस्थितांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, भुतेकर यांची काही महिन्यांपूर्वीच बायपास शस्त्रक्रिया झाली होती. तरीही लेकीचे लग्न थाटामाटात पार पाडण्याचा त्यांचा निर्धार होता. सर्व तयारी पूर्ण करून त्यांनी आनंदाने कन्यादानासाठी उभे राहताच काळाने त्यांना गाठले.
या घटनेने लग्नमंडपातील आनंद क्षणात शोकसभेत परिवर्तित झाला. एका बाजूला नववधूच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असताना, दुसऱ्या बाजूला वडिलांचा अखेरचा निरोप घ्यावा लागल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.
भुतेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण वरदडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. “लेकीचा संसार सुखाचा व्हावा,” हीच इच्छा मनात ठेवून उभा असलेला पिता कन्यादान करतानाच निघून गेल्याने ही घटना काळजाला चटका लावणारी ठरली आहे.











