बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जालना जिल्ह्यात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित बटन गोळ्यांच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला असून मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. ‘हॅलो बुलढाणा’च्या हाती लागलेल्या माहितीनुसार, कदीम पोलिसांनी नुतन वसाहत परिसरात धडक कारवाई करत 29 पाकिटे बटन गोळ्या आणि 76 बॉटल कफ सिरप जप्त केले आहेत.
सय्यद सलमान सय्यद गफार, करण सुरेंद्रसिंग ठाकुर आणि गिरीश लक्ष्मीकांत लताड अशी अटक आरोपींची नावे असून, हे तिघे मिळून युवकांना नशेच्या गर्तेत ढकलण्याचा धंदा करत होते. विशेष म्हणजे या रॅकेटचा धागा थेट देऊळगाव राजा येथे जोडला गेला असून, तेथून मोठ्या प्रमाणात गोळ्या व सिरप जालन्यात आणले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.
एसपी तेघबीर सिंह सिंधू यांच्या आदेशानुसार पीआय जनार्दन शेवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने जाळे टाकत ही टोळी पकडली. या प्रकरणात आणखी काही आरोपी रडारवर असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देऊळगाव राजा येथून होत असलेल्या या बेकायदेशीर पुरवठ्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून युवकांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.











