जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा /ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील राजूरा शिवारात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या निर्घृण खुनाचा अखेर थरारक उलगडा झाला असून, या प्रकरणात स्वतःच्या वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. या गुन्ह्यात मुलीच्या भावानेही साथ दिल्याचे निष्पन्न झाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे.
दि. 26 एप्रिल रोजी राजूरा शिवारात एका तरुणीचे मुंडके नसलेले, अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत संवेदनशीलतेने तपास सुरू केला.
तपासादरम्यान बुलढाणा, अमरावती, अकोला तसेच मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे पथके रवाना करण्यात आली. तब्बल 12 दिवसांच्या अथक शोधमोहीमीनंतर मृत महिलेची ओळख शिवानी बापूराम कलमेकर (रा. खडकी, जि. बुरहानपूर) अशी पटली.
चौकशीत समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, शिवानीचे लग्न झाल्यानंतरही तिचे चुलत भावासोबत प्रेमसंबंध सुरू होते. यामुळे संतप्त झालेल्या वडील बापूराम कलमेकर यांनी 23 एप्रिल रोजी तिच्या डोक्यात बांबूने वार करून हत्या केली. त्यानंतर मुलगा अजयच्या मदतीने मृतदेह मोटारसायकलवरून राजूरा शिवारात आणून टाकण्यात आला. पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेत जाळण्याचा आणि मुंडके वेगळे फेकण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींना अटक केली. सध्या पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन करत आहे.











