मेहकर (हॅलो बुलढाणा/ गजानन राऊत) वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने जिथे माणसेही हैराण झाली आहेत, तिथे पक्ष्यांची अवस्था अधिकच बिकट होत आहे. अशा कठीण परिस्थितीत मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील इयत्ता सातवीत शिकणारी शितल गजानन राऊत हिने आपल्या संवेदनशीलतेने सर्वांचे मन जिंकले आहे.
उन्हाळी सुटीचा सदुपयोग करत शितलने पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्याचा अनोखा उपक्रम राबवला. कॅन, प्लास्टिकच्या बाटल्या आणि लाकडी बॉक्स यांसारख्या सहज उपलब्ध वस्तूंचा वापर करून तिने सुंदर व उपयुक्त घरटी बनवली. ही घरटी तिने शेतातील झाडांवर लावून त्यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
या उपक्रमामुळे उन्हाने त्रस्त पक्ष्यांना मोठा दिलासा मिळत असून परिसरात शितलच्या कामाचे कौतुक होत आहे. तिच्या या प्रयत्नांचे व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
शितलचा हा उपक्रम केवळ मदतीचा हात नसून समाजासाठी प्रेरणादायी संदेश आहे.उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.











