spot_img
spot_img

BREAKING राजूर घाटात भीषण वनवा! अजिंठा पर्वतरांग जळतेय; प्रशासनाची धावपळ सुरू

बुलढाणा (हॅलो बुलढाणा), दि. ३ बुलढाणा–मलकापूर महामार्गालगतच्या राजूर घाट परिसरात आज सायंकाळी भीषण वनवा भडकला असून अजिंठा पर्वतरांगेतील खैरखेड-खामखेड शिवारातील जंगल अक्षरशः जळत आहे. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोताळा वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाऱ्याच्या वेगामुळे आणि कोरड्या झाडाझुडपांमुळे आग झपाट्याने पसरत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

बुलढाणा नगर परिषदेचे अग्निशमन दल देखील घटनास्थळी पोहोचले असून वनविभागाच्या पथकांसोबत संयुक्त कारवाई करत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही अद्याप आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. जंगलातील मोठ्या प्रमाणातील जैवविविधता धोक्यात आली असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मानवी निष्काळजीपणा की नैसर्गिक कारण, याचा शोध वनविभाग घेत आहे. दरम्यान, मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी पंकज अडसपुरे यांनी ‘हॅलो बुलढाणा’शी बोलताना सांगितले की, “आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणा झटत आहेत आणि लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल.”

दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राजूर घाट परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!