spot_img
spot_img

BREAKING : हार्वेस्टरवरील वादातून थेट खून; ‘हार्ट अटॅक’ची बनावट कथा फोल! पंजाबच्या कामगाराची साखरखेर्डा हद्दीत हत्या

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील पिंपळगाव उंडा शिवारात घडलेली कामगाराच्या मृत्यूची घटना नैसर्गिक नसून थेट खून असल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून, ‘हार्ट अटॅक’ची बनावट कथा रचून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मृतक करमजीतसिंग उर्फ मंजीतसिंग जनकसिंग (वय अंदाजे ५०-५५, रा. पंजाब) हा मागील काही वर्षांपासून हार्वेस्टर मशीनवर फोरमेन म्हणून काम करत होता. सध्या तो पिंपळगाव उंडा येथे गहू व मका काढणीसाठी आला होता. त्याच्यासोबत मदतनीस म्हणून बबलीसिंग करणसिंग (वय ३४, रा. मानसा, पंजाब) कार्यरत होता.

दि. २९ एप्रिलच्या रात्री कामाच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. जमीन मोजणी व धान्य गळतीच्या मुद्द्यावरून हा वाद चिघळला. संतापाच्या भरात आरोपी बबलीसिंगने लोखंडी सळईने करमजीतसिंगच्या डोक्यावर मागून जबरदस्त वार केला. गंभीर जखमी अवस्थेत करमजीतसिंगला खाटेवर टाकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

खुनाचा संशय येऊ नये यासाठी ‘हृदयविकाराचा झटका’ आल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, सकाळी व्यायामासाठी गेलेल्या गावकऱ्यांना करमजीतसिंग मृत अवस्थेत आढळल्याने संशय निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता डोक्यावर खोल जखम आढळून आली आणि प्रकरणाची दिशा बदलली.

साखरखेर्डा पोलिसांचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या सात तासांत तपासाची सूत्रे हलली. पंजाबमधील सात कामगारांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता आरोपी बबलीसिंग फरार असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान, जखमी अवस्थेत करमजीतसिंगने आपल्या मालकाला फोन करण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. डोक्यावर पगडी असल्याने रक्तस्त्राव लगेच लक्षात आला नाही.

या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!