spot_img
spot_img

प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी संतप्त; वरवंडचा ‘कोंडवाडा’ वाचवण्यासाठी आरपारची लढाई! ​महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा इशारा; प्रशासकीय ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण?

​बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एकीकडे राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे एका शेतकऱ्याला आपल्या हक्कासाठी प्राणाची आहुती देण्याची वेळ आली आहे. गावातील शेतकऱ्यांच्या हिताचा ‘कोंडवाडा’ पाडून त्या ठिकाणी तलाठी कार्यालय रेटण्याचे कारस्थान ग्रामपंचायतीने रचले असून, या अन्यायाविरुद्ध शेतकरी प्रकाश जेऊघाले यांनी आगामी १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी गावात ‘कोंडवाडा’ असणे ही काळाची गरज आहे. वरवंड येथे हा कोंडवाडा गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून तो शेतकऱ्यांच्या उपयोगात आहे. मात्र, ग्रामपंचायतीने हा कोंडवाडा जमीनदोस्त करून त्याच जागेवर तलाठी कार्यालय बांधण्याचा अट्टहास धरला आहे. विशेष म्हणजे, गावात तलाठी कार्यालयासाठी इतर अनेक मोकळ्या शासकीय जागा उपलब्ध असताना, जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या हक्काच्या जागेवरच घाला का घातला जातोय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.शेतकरी प्रकाश जेऊघाले यांनी या अवैध बांधकामाबाबत ग्रामपंचायतीकडे पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केली होती. नियमानुसार, कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यावर त्या कामाची शहानिशा करून वस्तुस्थिती तपासेपर्यंत काम थांबवणे अपेक्षित होते. मात्र, वरवंडचे ग्रामविकास अधिकारी सुनील हिवाळे यांनी या तक्रारीला केराची टोपली दाखवत, हे बांधकाम एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यासाठी आपला ‘मनमानी’ रेटा सुरूच ठेवला आहे. तक्रारदाराला न्याय देण्याऐवजी बांधकाम पूर्ण करण्यासाठी दाखवली जाणारी ही घाई कुणाच्या फायद्यासाठी? असा संशय आता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.​या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे (BDO) वारंवार निवेदने देऊनही संबंधित यंत्रणेने कोणतीही दखल घेतली नाही. प्रशासकीय अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप होत आहे. अखेर, व्यवस्थेपुढे हतबल झालेल्या प्रकाश जेऊघाले यांनी थेट आत्मदहनाचा इशारा देणारे पत्र प्रशासनाला सादर केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!