spot_img
spot_img

बुलढाण्यात भीषण अपघात! स्वप्नांच्या मागे धावणारा तरुण गेला चाकाखाली; भरतीची तयारी करत होता… पण बसने घेतला जीव! संतापजनक घटना

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील बसस्थानकात पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा बळी गेला असून, पोलीस भरतीसाठी स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मढ ते धाड मार्गावरील बसमध्ये चढताना गिरडा (ता. बुलढाणा) येथील चेतन सुरेश सोलंकी (वय १८) हा बसला लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अचानक तोल गेल्याने तो खाली कोसळला आणि क्षणार्धात बसचे चाक त्याच्या अंगावरून गेले. या भीषण अपघातात चेतन गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर बसस्थानकात एकच खळबळ उडाली. नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तत्काळ स्थानिकांनी आणि प्रशासनाने हालचाल करत चेतनला अंबुलन्सद्वारे संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवले. मात्र उपचारासाठी नेत असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला.

विशेष म्हणजे, चेतन हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून पोलीस भरतीसाठी दिवस-रात्र मेहनत घेत होता. त्याचे हे स्वप्न अधुरेच राहिले. या घटनेमुळे गिरडा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, बसस्थानकातील सुरक्षेचा अभाव, वाहतूक नियंत्रणातील ढिसाळपणा आणि बसचालकांची बेफिकिरी यामुळेच हा बळी गेला का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शासनाने तात्काळ मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. आता तरी प्रशासन जागं होणार का, की आणखी किती निष्पाप जीवांचा बळी जाणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!