कोल्हापूर (हॅलो बुलडाणा) बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यावेळी प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाणे येथे त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘शिवाजी कोण होता?’ या वादग्रस्त पुस्तकाच्या मुद्द्यावरून संतापलेल्या गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आंबी यांनी थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भारतीय न्याय संहिता कलम 351(3), 352 आणि 356 अंतर्गत गुन्हा नोंदवला.
विशेष म्हणजे, हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिले असून गेली अनेक वर्षे राज्यभर वितरित केले जात आहे. मात्र या पुस्तकाच्या शीर्षकावरून निर्माण झालेला वाद आता थेट धमकीपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती अधिकच तापली आहे.
दरम्यान, आमदाराकडून अशा प्रकारची भाषा आणि धमकी दिल्याचा आरोप गंभीर मानला जात असून विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कायदा सर्वांसाठी समान असताना सत्ताधारी आमदारावर काय कारवाई होते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
या घटनेमुळे बुलढाणा ते कोल्हापूरपर्यंत राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, पुढील काही तासांत या प्रकरणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











