बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी (शिंदे गटाचे) आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, त्यांच्या वक्तव्यांवर आणि शिवीगाळीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. प्रसिद्धीसाठी त्यांच्या नावाचा वापर करून अश्लील भाषेत बोलणं अत्यंत अयोग्य आहे,” असे ठाम मत काकस यांनी मांडले.
गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना काकस म्हणाले, “प्रकाशकांनी सांगितलंय की पुस्तक वाचा, मग प्रतिक्रिया द्या. त्यामुळे गायकवाडांनी आधी ते पुस्तक वाचावं आणि मगच बोलावं.” तसेच त्यांनी भाजपच्या इतर नेत्यांनी पूर्वी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरही सवाल उपस्थित करत, “तेव्हा तुम्ही झोपले होते का?” असा थेट प्रश्न केला.
शिवीगाळीच्या मुद्द्यावर काकस यांनी गायकवाडांना सुनावलं की, “ही भाषा आम्ही 20-25 वर्षांपूर्वी अशिक्षित लोकांकडून ऐकली होती. पण समाज आता सुशिक्षित झाला आहे.गायकवाडांनी मात्र जुन्या घाणेरड्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या.” त्यांनी गायकवाडांच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याचीही मागणी यावेळी केली.
याशिवाय, मुस्लिम आणि ब्राह्मण समाजाबद्दल गायकवाड यांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका करत, “मतांसाठी समाजातील त्यास्वार्थी दलालांचा वापर करून आता त्याच समाजावर टीका करणं हा त्यांचा पहिले पासून स्वभावच आहे,” असा घणाघात आरोप केला.
“शिवाजी महाराजांचा वापर शिव्या देण्यासाठी नाही, तर आदर्श म्हणून करण्यासाठी आहे,” असा कडक इशारा देत काकस यांनी (शिंदे गटाचे) आमदार संजय गायकवाडांना स्वतःच्या वक्तव्यावर ठाम राहण्याचं आव्हान दिलं.










