spot_img
spot_img

महाबळेश्वरात ठरलं… आता राज्यभर आंदोलनाचे दणके!

महाबळेश्वर (हॅलो बुलडाणा) शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला थेट इशारा देत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्यात नव्या लढ्याची घोषणा केली आहे. महाबळेश्वर येथील दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोपावेळी तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत ही कर्जमाफी फसवी, अन्यायकारक आणि शेतकऱ्यांची थट्टा आहे असा आरोप केला.

तुपकर म्हणाले, सरकारने कोणतीही अट न लावता सरसकट ५ लाखांची कर्जमाफी द्यावी, तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना १.५ लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे. अन्यथा येत्या १५ दिवसांत राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा अल्टिमेटम त्यांनी दिला. सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा यांसारख्या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, तसेच भारत-अमेरिका व्यापारी करार रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

सरकारवर निशाणा साधताना तुपकर यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सरकारविरोधात बोलणाऱ्यांना दाबले जात आहे. सध्याची परिस्थिती ही द इमर्जन्सी पेक्षाही धोकादायक आहे.

या शिबिरात राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटीसाठी प्रशिक्षण देण्यात आले. येत्या काळात राज्यभर संघटना विस्तार मोहीम राबवली जाणार असून निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करून नवीन नियुक्त्या केल्या जातील, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संदीप काळे यांनी येणारा काळ क्रांतिकारीचा असेल असा विश्वास व्यक्त केला, तर अनिल म्हस्के यांनी तुपकर यांना शेतकरी चळवळीतील बावन्नकशी हिरा असे संबोधत कार्यकर्त्यांना एकजूट राखण्याचे आवाहन केले.महाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या साक्षीने पेटलेला हा संघर्ष आता राज्यभर पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!