दुसरबीड (हॅलो बुलडाणा/प्रदीप साळवे) गुझदेर बी डिव्हिजन T-20 क्रिकेट स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्हा संघात दुसर बीड येथील युवा क्रिकेटपटू यश अनिल साळवे याची अंडर-19 गटात निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या यशने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ही संधी मिळवली आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून यश सातत्याने क्रिकेटचा सराव करत असून नागपूर येथील बीसीए क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याने व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपली खेळातील गुणवत्ता अधिक परिष्कृत केली असून त्याच्या मेहनतीचे फळ म्हणूनच ही निवड झाली आहे.
यशच्या निवडीमुळे दुसर बीड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच या भागातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. यशच्या माध्यमातून दुसर बीड व परिसराला प्रथमच अशी मोठी संधी मिळत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.










