चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) बुलढाणा जिल्ह्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांवर संकट घोंघावत असतानाच आता शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरू लागला आहे. जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर यावे, अशी मागणी करत चिखलीत शेतकरी संघटना आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाख रुपये मदत देण्याची मागणी इतर शेतकरी संघटनांकडूनही अलीकडे पुढे आली आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली पोलीस निरीक्षकांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार अर्ज दिला.
“काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या”, “शोधून द्या, शोधून द्या, पालकमंत्री शोधून द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. बैठका आणि चर्चांपेक्षा मंत्र्यांनी प्रत्यक्ष शिवारात उतरून करपणारी सोयाबीन, तूर, कापूस व उडीद पिकांची पाहणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्त क्षेत्र तातडीने जाहीर करणे, पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करणे, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे, पाणी व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
शेतकरी संकटात आहे; सरकारने कागदी बैठकीत नव्हे, बांधावर दिसावे, असा सूर आंदोलकांनी लावला. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
आंदोलनात उद्धव थुट्टे, मुरलीधर येवले, विठ्ठल सोळंकी, शेषराव शेळके, रवि टाले, राजू शेटे, गजानन कुटे, रामदास शेळके यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले.












Total Users : 3487642