चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील भरोसा येथे 24 वर्षीय तरुण शेतकरी सागर कचरूबा जोहारे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 19 तारखेला “शेतात पाणी देऊन येतो” असे सांगून घरातून निघालेला सागर परत न आल्याने कुटुंबीयांनी दोन दिवस सर्वत्र शोध घेतला; मात्र काहीच पत्ता लागला नाही. अखेर 21 तारखेला सकाळी 7 वाजताच्या सुमारास खडकपूर्णा धरणातून येणाऱ्या जयसेवालाल पाटातील जाळीत त्यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.
शेतात जाणाऱ्या स्थानिकांना हा प्रकार दिसताच त्यांनी तत्काळ अंधेरा पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे पाठविण्यात आला आहे.
या घटनेमुळे भरोसा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ सोनकांबळे पुढील तपास करीत आहेत.











